मुंबई : मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. या घटनेत तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये तीन नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. तसेच या बोटमधून १०१ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
मुंबईवरून एलिफंटाकडे नीलकमल ही बोट जात होती. मात्र, या बोटीला गेट ऑफ इंडियाजवळ ही बोट बुडाल्याची घटना घडली. या बोटेतून १०० पेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करत होते. ही दुर्घटना घडल्यानंतर लगेचच तातडीने मदतकार्य करण्यात आले. यावेळी नौदलाने या बोटीमधील १०१ प्रवाशांना सुरक्षित वाचवलं. तर या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अद्यापही नौदलाकडून आणि पोलिसांच्या समन्वयाने बचाव कार्य करण्यात येत आहे. यामध्ये चार नौदलाचे हेलिकॉप्टर, ११ नौदल क्राफ्ट आणि एक तटरक्षक दलाची नौका आणि तीन सागरी पोलीस नौका बचावकार्य करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.