प्रशासन लवकर पावले उचलणार का? – नागरिकांचे लक्ष
लातूर (उदगीर) (अविनाश देवकते) : उदगीर शहरातील मध्यवस्तीत कापड मार्केट गल्ली आणि त्यास लागून असलेल्या मुख्य रस्त्यावरील बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या कापड दुकानांविरोधात नागरिकांमध्ये नाराजी आहे. या संदर्भात स्थानिक पत्रकार रामबिलास आर. नावंदर खेरडेकर यांनी मुख्याधिकारी, नगर परिषद उदगीर यांच्याकडे निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली आहे.
बेकायदेशीर बांधकाम आणि नागरी अडथळा
उदगीर शहरातील प्रमुख मार्गांपैकी एक असलेल्या या भागात काही व्यावसायिकांनी आपल्या कापड दुकाने अधिकृत कापड मार्केटमध्ये न भरता, मंदिर व घरांच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मांडली आहेत. यामुळे या भागातील रहिवाशांना तसेच वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. पूनम हॅन्डलूम अँड क्लॉथ सेंटर हे ठोक कापड दुकान देखील अशाच प्रकारे उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नगरपालिकेकडून परवानगी आहे का?
या दुकानांना उदगीर नगरपालिकेने अधिकृत परवानगी दिली आहे का? तसेच, त्यांनी बांधकाम परवान्याच्या अटींचे पालन केले आहे का? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार नावंदर यांनी केली आहे. जर हे बांधकाम बेकायदेशीर असेल, तर नगरपालिका प्रशासनाने तात्काळ पाहणी करून योग्य ती दंडात्मक कारवाई करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दुकाने अधिकृत मार्केटमध्ये हलवावी
रस्त्यावरील दुकानांमुळे नागरीकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सदरील दुकानांना अधिकृत कापड मार्केटमध्ये हलविण्यात यावे, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. नगरपरिषद प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, असे नागरिक आणि स्थानिक पत्रकारांकडून सांगण्यात आले आहे.
नागरिकांची अपेक्षा – प्रशासनाने लवकरात लवकर पाऊले उचलावीत
रस्त्यावर व्यापारी अडथळा निर्माण झाल्यामुळे नागरिक आणि वाहनधारक हैराण झाले आहेत. प्रशासनाने त्वरित चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. आता पाहावे लागेल की नगरपरिषद प्रशासन यावर काय निर्णय घेते.