
मावळ ( पिंपरी चिंचवड): रविवार सुट्टीचा दिवस, पर्यटकांसाठी घातवार ठरला आहे. मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा येथील साकव पूल कोसळल्याने ६ जणांचा अंत झाला असून वीस ते पंचवीस पर्यटक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मावळातील तळेगाव दाभाडे आणि देहू गावच्या मध्ये कुंड मळा आहे. इंद्रायणी नदीवर कुंडमळा येथे वर्षविधारासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. त्या ठिकाणी असणारा साकपूल हा जुना झालेला आहे. आज दुपारी ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी झाली होती. हा पूल अत्यंत अरुंद आहे. तसेच या ठिकाणी मोठी वाहने जाऊ शकत नाही. तसेच पुलावर वाहन गेल्यानंतर हादरे बसतात. पुलावर दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पर्यटक उभे राहून नदीतून वाहणारे पाणी पाहत होते. त्यावेळी अचानक लोखंडे आणि काँक्रीटमध्ये असणारा पूल कोसळला. आणि काही क्षणात पुलावरील सर्वजण नदीपात्रात कोसळले.
अचानक घडलेल्या या घटनेने या ठिकाणी तारांबळ उडाली. काही तरुणांनी पाण्यातून वाहून जाणाऱ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि पुलावर असणारे अनेक जण नदीच्या पाण्यात वाहून गेले. अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बघ्याची गर्दी झाली होती. त्यानंतर काही वेळातच पोलीस आणि अग्निशामक दलाचे पथक दाखल झाले आहे व पाण्यात वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेतला जात आहे.

Belgaum Varta Belgaum Varta