
मुंबई : ‘कांटा गला’ गाणं आणि ‘बिग बॉस’ मुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे निधन झाले आहे. अभिनेत्रीच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 42 व्या वर्षी कार्डियक अरेस्टमुळे अभिनेत्रीने शेवटचा श्वास घेतला आहे. अभिनेत्रीच्या निधनाची माहिती समोर येताच टीव्ही विश्वात खळबळ माजली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी लोखंडवाला परिसरात राहणारी अभिनेत्री शेफाली रात्री 11 च्यासुमारास गंभीर आजारी पडली. छातीत दुखू लागल्याने, पती आणि अभिनेता पराग त्यागी तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेला. रुग्णालयात पोहोचताच अभिनेत्रीला मृत घोषित करण्यात आलं. सध्या तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
ज्येष्ठ चित्रपट समीक्षक विकी लालवानी यांच्या इन्स्टाग्राम पेजने शेफाली जरीवालाच्या मृत्यूची पुष्टी केली. विकी लालवानी यांच्यानुसार, शेफालीच्या पतीने तिला अंधेरीतील बेलेव्ह्यू रुग्णालयात आणले. परंतु डॉक्टर तिच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वीच शेफालीचा मृत्यू झाला.
आतापर्यंत मिळालेल्या अपडेट्सनुसार, शेफालीने 3 दिवसांपूर्वी एक फोटोशूट देखील केले होते. सध्या शेफालीची शेवटची पोस्ट देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गेल्या काही वर्षांपासून छोट्या पडद्यापासून देखील दूर असलेली शेफाली सोशल मीडियावर कायम सक्रिय होती.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शेफाली हिच्या निधनाची चर्चा सुरु आहे. शेफालीच्या निधनाची माहिती मिळताच तिच्या जवळच्या व्यक्तींना देखील मोठा धक्का बसला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta