
मुंबई : हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने आज विजयी सभेचे आयोजन करण्यात आले. सुमारे दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र दिसल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवे पर्व सुरु झाले आहे.
हिंदी सक्तीच्या निर्णयाला झालेल्या विरोधानंतर सरकारने हा निर्णय रद्द केला. या विरोधात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार होते. पण निर्णय रद्द झाल्यानंतर मोर्चाऐवजी विजयी मेळावा पार पडला. वरळी येथे या मेळाव्याला सुरुवात झाली. त्यात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल पण राज आणि उद्धव ठाकरे यासाठी एकाच जागी आले.

यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. आमची मुले इंग्रजी शाळेत शिकले, तसे बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरेही इंग्रजी शाळेत शिकले होते, पण त्यांचा मराठी अभिमान तसूभर कमी झाला नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले. मराठीसाठी यापुढेही एकजूट कायम राहो, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. “खरे तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचे चित्र मोठ्याप्रमाणावर उभे राहिले असते. पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. आजचा मेळावा शिवतीर्थवर व्हायला पाहिजे होता. पण पाऊस आहे. बाहेर उभे आहेत त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. 20 वर्षांनी आम्ही एकत्र येतोय. जे बाळासाहेबांना जमले नाही जे अनेकांना जमले नाही. ते देवेंद्र फडणवीसांना जमले.”, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
उद्धव ठाकरे यांनीही आपल्या भाषणातून भाजपावर जोरदार टीका केली. आम्ही निवडणुकीसाठी नाही तर मराठीसाठी एकत्र आलो आहोत, असे ते म्हणाले. आमच्यातला आंतरपाठ अनाजीपंतांनी दूर केला, एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी” असे विधान करुन पुढील राजकीय घडामोडींचे संकेत दिले दादागिरी करणार नाही, कुणी दादागिरी केली तर सहन करणार नाही. सर्व मतभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. सर्व मराठीप्रेमींनी तुटू नका, फुटू नका, मराठी ठसा पुसू नका असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
या मेळाव्याला प्रकाश रेड्डी, सुप्रिया सुळे, अजित नवले, जितेंद्र आव्हाड आव्हाड, महादेव जानकर, जयंत पाटील (शेकाप), विनोद निकोले, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, संजय राऊत असे विविध पक्षांचे नेतेही उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta