
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनाच्या लॉबीतच हाणामारी झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण झाली आहे. गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले याने ही मारहाण केली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
काल देखील जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये वाद झालेला होता. कालचा वाद हा शिवागाळ करण्यापर्यंत होता. मात्र, आज विधानभवनाच्या लॉबीतच जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते भिडले यामुळे विधानभवन परिसरात काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या विधानभवनाच्या लॉबीत झालेल्या मारहाणीचा मुद्दा विधानसभेत देखील गाजला. अनेक आमदारांनी चिंता व्यक्त केली आहे. विधानभवनात येताना अडचणी येत असल्याचे आमदार सना मलिक यांनी आरोप केला आहे.
पहिल्यांदा पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. आम्हाला याच्यापेक्षा जास्त पुरावा देण्याची गरज नसल्याचे आव्हाड म्हणाले. जर तुम्ही विधानसभेत गुंडाना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर कोणतेच लोक सुरक्षीत नाहीत असे आव्हाड म्हणाले. मला शिव्या दिल्या आहेत. कुत्रा, डुक्कर, तुला मारुन टाकू अशा धमक्या दिल्याचे आव्हाड म्हणाले. मलाच मारण्यासाठी सगळे आले होते असा आरोप आव्हाड यांनी केला.
दरम्यान, या घटनेनंतर प्रसारमाध्यमांनी गोपीचंद पडळकर यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी मला याबाबत काही माहिती नसल्याचे वक्तव्य पडळकर यांनी केले आहे. त्याला जाऊन भेटा असे पडळकर म्हणाले. तो तिथे आहे, त्याच काय झाले तिथे जाऊन बघा, माझ्या ओळखीचा नाही असे पडळकर म्हणाले.

Belgaum Varta Belgaum Varta