Tuesday , March 3 2026
Breaking News

१० मार्चला पुन्हा गिरणी कामगार विधान भवनावर धडकणार – मुंबईतील सभेतून ठाम इशारा

Spread the love

 

मुंबई (अर्जुन विष्णू जाधव) : करीरोड मुंबई येथील मधु दंडवते सभागृहात संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या वतीने आयोजित केलेली गिरणी कामगार व वारसाची भव्य सभा उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. या सभेतून महाराष्ट्र सरकारला कडक शब्दात इशारा देण्यात आला की गिरणी कामगारांच्या घराचा, पुनवर्सनाचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास १० मार्चला लाखो गिरणी कामगार विधान भवनावर धडक मोर्चा काढून सरकारला धारेवर धरतील. आश्वासनांची पुनरावृत्ती आता सहन केली जाणार नाही असा ठाम निर्धार गिरणी कामगारातून व्यक्त करण्यात आला.

या सभेतून बेधडकपणे सरकारसमोर स्पष्ट करण्यात आले की, गिरणी कामगारांना मुंबईत घरे देण्यासाठी स्पष्ट, कालबद्ध व नियोजित आराखडा जाहीर करावा आणि त्यामाध्यमातून गिरणी कामगारांना मुंबईतील घराची हमी देणारी इरादा पत्रे तात्काळ वितरित करावीत, तसेच वंचित गिरणी कामगारांना पुन्हा नव्याने अर्ज करण्याची एक संधी देण्यात यावी. तसेच १९८१ च्या संपातील गिरणी कामगारांनाही सदनिकेच्या प्रकल्पात सामावून घेण्यात यावे. पुनर्वसनासाठी उपलब्ध पर्यायांबाबत सभेत नमूद करण्यात आले की सुमारे ६०० एकर साॅलट लॅड (खार जमीन) १२१ एकर एनटीसीची जमीन, बीपीटी येथील कापसाच्या गोदामाची जमीन तसेच संक्रमण शिबिरातील सुमारे ६ ते ६.५ हजार घरे गिरणी कामगारांसाठी वापरात येऊ शकतात. महाराष्ट्र शासन, म्हाडा व इतर संस्थांचे मुंबईतील सध्या सुरू असलेले ५६ पुनवर्सन प्रकल्प तसेच धारावी व बीडीडी सारख्या मोठ्या प्रकल्पांमध्येही गिरणी कामगाराचे पुनर्वसन करणे शक्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले. रमाबाई नगर प्रकल्पात सुमारे १८ हजार घरे नियोजित असूनही गिरणी कामगारांसाठी स्वतंत्र आराखडा जाहीर झालेला नाही. याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

संयुक्त मराठीचे युवा नेतृत्व रमाकांत बने यांनी सांगितले की, पुनर्वसनासाठी पर्याय उपलब्ध असताना अंमलबजावणी टाळणे अन्यायकारक आहे. सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास १० मार्चला लाखो गिरणी कामगाराचा मोर्चा निर्णायक ठरेल.

या सभेला अँड. अरूण निंबाळकर, अँड. बबन मोरे, अँड.सुनिल साळुंखे सघटनेचे अध्यक्ष विवेकानंद बेळुसे, रमाकांत बने यांनी मार्गदर्शन केले तसेच श्याम कबाडी, रवींद्र ताम्हणकर, शिवराम जाधव, रवींद्र गवळी, प्रवीण कदम, हरिश्चंद्र करगळ, प्रज्ञा कदम, मधुकर साठे, सिध्दनाथ चव्हाण, अर्जुन जाधव आणि मोठ्या संख्येने गिरणी कामगार व त्यांचे वारसदार उपस्थित होते. सभा संघर्षाच्या निर्धाराने संपन्न झाली असून गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळेपर्यंत लढा तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

शरद पवारांची तब्येत बिघडली, पुण्यातील रुग्णालयात दाखल केले जाणार

Spread the love  पुणे : खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. शरद पवार सध्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *