कोल्हापूर : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार स्पर्धा परीक्षेनंतर नेमणूक झालेल्या २१८५ उमेदवारांना राज्य सरकारने त्वरित नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी मराठा समाजाकडून होत आहे. यासाठी राज्य सरकारने पावलं न उचलून मराठा समाजावर अन्याय केला आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर असताना सकल मराठा समाज्याच्यावतीने त्यांच्या समोर निदर्शने करण्याचे जाहीर केले होते. पण या आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी मराठा समाजाच्या कार्यालयासमोरच रोखले. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.
पोलिसांनी आंदोलन दडपल्याचा निषेध करत मराठा कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून निषेधाच्या घोषणा दिल्या. राज्य सरकारने या नेमणूका देईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला. सावित्रीबाई फुले हॉस्पिटलजवळील जिजाऊ कार्यालयासमोर हे आंदोलन झाले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील, सचिन तोडकर, स्वप्नील पार्टे, नितीन देसाई, भास्कर पाटील, पंकज कडावकर, भगवान काटे, वीरेंद्र मोहिते, धनश्री तोडकर, जयश्री वायचळ आदींनी सहभाग घेतला. या आंदोलनावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.