कोल्हापूर येथे सारथीच्या उपकेंद्राचे उद्घाटन
कोल्हापूर : ‘मराठा सामजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी राज्य सरकारची ठाम भूमिका आहे. मराठा समाजाची मते, विचार, जुळलेले आहेत. त्यामुळे संघर्ष करण्याची गरज नाही, संवादातून प्रश्न सोडवता येतात या भूमिकेतूनच कोल्हापुरात सारथीचे उपकेंद्र सुरू झाले आहे. हे केंद्र मराठा समाजाला दिशा देईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. कोल्हापुरातील राजाराम कॉलजे येथे सुरू करण्यात आलेल्या सारथी उपकेंद्राचे ऑनलाईन उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मराठा समाजाने संयमाची भूमिका घेतल्याचे सांगून ठाकरे म्हणाले, ‘मनात आणले असते तर मराठा आरक्षणावरून राज्यात वणवा पेटला असता. पण खासदार संभाजीराजे यांनी संघर्ष सोडून संवादाची तयारी दर्शवली. मुळातच जे विरोध करतात त्यांच्याशी संघर्ष करायचा असतो. आम्ही तुमच्या सोबत आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सोडवावा, अशी मागणी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याकडेही केली आहे. याशिवाय कायदेशीर लढाई सुरू आहे. सरकार म्हणून जे करणे शक्य आहे ते सर्व करण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारची आहे. काही लोक आदळाआपट करून विनाकारण वाद निर्माण करण्यचा प्रयत्न करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, शाहू महाराज छत्रपती, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संभाजीराजे यांची भाषणे झाली.
यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराजे देसाई उपस्थित होते.