कोल्हापूर : मराठा आरक्षण प्रश्नी उद्या (१६) मुक आंदोलनाची सुरुवात कोल्हापूरातून होणार आहे. खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलनाची हाक दिली आहे. आता या आंदोलनात वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर सहभागी होणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
उद्या कोल्हापुरातून सुरु होणाऱ्या मुक आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. १६ जून रोजी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खा. संभाजी राजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षणप्रश्नी मुक आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी जाहिर केले आहे. वंचित आघाडीने ट्वीट करून याबद्दल माहिती दिली आहे.
दरम्यान संभाजीराजे यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेतली होती. त्यांच्यासोबतच्या भेटीमुळे नवीन आघाडीचा फॉर्म्युला तयार केला जात असल्याची चर्चा रंगली होती. आता खुद्द प्रकाश आंबेडकर यांच्या सहभागामुळे राज्यातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
उद्याच्या मुक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी लोकप्रतिनिधींना सन्मानपूर्वक वागणूक देऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा समाजाने सज्ज व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.