बंधाऱ्यावर बघ्याची गर्दी : अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
निपाणी (संजय सूर्यवंशी) : चार ते पाच दिवसाच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. अनेकाचे संसार उघड्यावर पडलेले आहेत. निपाणी तालुक्यातील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. निपाणी तालुक्यातील वेदगंगा नदीवरील अकोळ सिदनाळ बंधारा मागील दोन दिवसापूर्वीच संपूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे दोन्ही गावचा संपर्क तुटला आहे. त्यातच आज सकाळी एक वेगळाच प्रसंग उघडकीस आला. दिग्विजय महारुद्र कुलकर्णी (वय 30) रा. मत्तीवडे (ता. हुकेरी) हा मानसिक मनोरुग्ण असलेला युवक आज सकाळी सात वाजल्यापासून बंधाऱ्याच्या मध्यभागी एका झाडाच्या मदतीने उभा असलेला गावकऱ्यांनी पाहिले. पाहता – पाहता बंधाऱ्यावर गर्दी होऊन सर्वत्र ही बातमी पसरली.
मतिवडे (ता. हुक्केरी) गावी सदरची बातमी कळाल्यानंतर तेथील तरूणांनी देखील सिदनाळ बंधाऱ्याकडे धाव घेतली आहे. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार दिग्विजय महारुद्र कुलकर्णी हा काल संध्याकाळी चार वाजल्यापासून आपल्या घरातून बाहेर पडला होता. हायवे वरील एका हॉटेलमध्ये सदरचा युवक जेवण करून रात्री अकरा वाजता येथून बाहेर पडल्याचे देखील गावातील तरुणांनी सांगितले पण अचानकपणे सकाळी सात वाजता अकोळ सिदनाळ बंधाऱ्याच्या पाण्याच्या मध्यभागी आढळून आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. हा युवक थोडा मानसिक रुग्ण असल्याचे घटनास्थळावरून बोलले जाते. घटनेचे वृत्त समजताच निपाणी तालुक्यातील एनडीआरएफ टीम, निपाणी तहसिलदार प्रकाश गायकवाड, निपाणी ग्रामीण पीएसआय बी. एस. तलवार अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आज दुपारी 2 वाजेपर्यंत देखील म्हणावे तसे यश प्राप्त झालेली नाही. सदरचा युवक पाण्यातील एका झाडाच्या बुंध्याला धरुन उभा आहे. गावकऱ्यांनी वेळीच सूचना करुन विद्युत पुरवठा वेळीच खंडित केल्यामुळे मोठा अनर्थ टाळल्याळे घटनास्थळावरून समजते.