निपाणी : कोरोना महामारीमुळे देशातील अनेक उद्योगधंदे आणि व्यवसाय बंद पडले आहेत. कर्नाटक राज्यातील वस्त्रोद्योगावर अवलंबून असलेल्या अनेक विणकरांना आर्थिक मदतीची आवश्यकता भासत होती. यासाठी मंत्रीमंडळ बैठकीमध्ये ३५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे व प्रत्येक विणकरांना ३ हजार रुपये आर्थिक मदत मंजूर केली आहे, अशी माहिती कर्नाटक राज्याचे वस्त्रोद्योग व अल्पसंख्याक मंत्री श्रीमंत पाटील यांनी दिली. विणकरांना मदत देण्यासाठी निधी मंजूर केल्याबद्दल मंत्री श्रीमंत पाटील यांचा कर्नाटक सीमाभाग पॉवरलुम असोसिएशनच्यावतीने माणकापूरचे अध्यक्ष अर्जुन कुंभार व ढोणेवाडीचे अध्यक्ष आण्णाप्पा नागराळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
श्रीमंत पाटील म्हणाले, विणकरांना लवकरच ओळखपत्र मिळणार आहे. तसेच सी.सी. लोन आणि मल्टीस्टेट लोनचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. कमीतकमी कागदपत्रांची पूर्तता करून विणकर, कांडीवाली, जॉबर, दिवाणजी, सफाई कर्मचारी, सायझिंग, वापिंग, सुतार, वेल्डींग, डबलींग, ट्विस्टींग कामगार आदी टेक्स्टाईल क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व घटकांना याचा लाभ मिळणार आहे. यावेळी लक्ष्मण दोनवडे, सोमनाथ परकाळे, अनिल पाटील तसेच निपाणी व चिक्कोडी तालुक्यातील विणकर बांधव उपस्थित होते.