नवी दिल्ली : कारगिलच्या लेह जिल्ह्यातील मंदिर मोरजवळ टँकचा अपघात झाला असून या दुर्घटनेत 5 जवान शहीद झाले आहेत. नदी पार करत असताना अचानक पाण्याची पातळी वाढल्याने टॅंकला अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लडाखच्या दौलत बेग ओल्डी भागात भारतीय सैन्यदलाच्या रणगाड्यांचा मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी याठिकाणी युद्ध सराव सुरू होता. यावेळी रणगाडे नदी ओलांडत असताना अचानक पाण्याची पातळी वाढल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या रणगाड्यांमध्ये अडकून पाच जवान शहीद झाले.
दौलत बेग ओल्डी हे उंचावरील युद्ध क्षेत्र आहे. या भागात अभ्यास दौरा सुरू होता. भारतीय सैन्यदलाचे अनेक टँक्स याठिकाणी आले होते. आज नदी पार करत असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. त्यामुळे रणगाडा अडकला, ज्यामध्ये असलेले पाच जवान शहीद झाले. या घटनेनंतर बचावकार्य सुरू आहे.
दरम्यान, या अपघाताच्या वेळी रणगाड्यामध्ये लष्कराचे पाच जवान उपस्थित होते. यामध्ये एक जेसीओ आणि चार सैनिकांचा समावेश आहे. एक जवान सापडला आहे, तर उर्वरित चार जवानांचा शोध सुरु आहे.