ओमानच्या समुद्रकिनार्यालगत एक तेलवाहू जहाज बुडाल्याची बातमी समोर येत आहे. या जहाजावर १३ भारतीय आणि ३ श्रीलंकन नागरिक असे १६ कर्मचारी होते. सोमवारी (१५ जुलै) जहाज बुडाल्याची घटना घडली असून तेव्हापासून हे सर्व कर्मचारी बेपत्ता आहेत. ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने मंगळवारी (१६ जुलै) याबाबतची बातमी दिली. सुरक्षा केंद्राने सांगितले की, प्रेस्टीज फाल्कन नावाचे तेलवाहू जहाज दुबईच्या बंदरावरून निघाले होते. ओमानमधील येमेन ऐडन बंदराकडे येत असताना हा अपघात घडला. डुकम या ओमानमधील आणखी एका बंदराजवळ असलेल्या रास मद्राकाच्या शहरापासून आग्नेय दिशेला २५ सागरी मैल अंतरावर हे जहाज बुडाले. दोन दिवसांपासून कर्मचार्यांना शोधण्याची मोहीम सुरू आहे.
ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने रॉयटर्स वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, तेलवाहू जहाज बुडाल्यामुळे ते समुद्रावर उलटे तरंगत होते. तथापि, जहाज पुन्हा सरळ केले गेले की नाही किंवा त्यातून तेलगळती झाली की नाही? याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
Belgaum Varta Belgaum Varta