नवी दिल्ली : दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस होत असल्याकारणाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीत जुने राजेंद्र नगर भागातही ठिकठिकाणी पाणी साचले. हा परिसर यूपीएससी परीक्षेच्या कोचिंग सेंटरसाठी ओळखला जातो. इथे शेकडो यूपीएससीची शिकवणी देणारे वर्ग आहेत. यापैकीच एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्यामुळे काही यूपीएससीचे विद्यार्थी अडकले होते.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे राजेंद्र नगर परीसर जलमय झाला असून याठिकाणी असलेल्या कोचिंग सेंटरच्या तळघरातही पाणी शिरले. त्यामुळे याठिकाणी असलेले लोक अडकले. अग्निशमन दलाला सायंकाळी ७ वाजता या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. आतमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांचे फोन बंद दाखवत असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.
अग्निशमन यंत्रणा आणि एनडीआरएफच्या जवानांनी मिळून तळघरात बचाव कार्य सुरू केल्यानंतर पहिल्यांदा एका मुलीचा मृतदेह बाहेर काढला गेला. त्यानंतर दुसऱ्याही एका मुलीचा मृतदेह आढळून आला.