कराची : पाकिस्तानच्या कुर्रम जिल्ह्यात जमिनीच्या वादातून रविवारी दोन गटांमध्ये संघर्ष झाला. यावेळी दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर सशस्त्र हल्ला चढवला. या हिंसाचारात जवळपास ३६ जणांचा मृत्यू झालाय. तर १६२ लोक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हिंसाचार प्रभावित भागात पोलीस आणि सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या अप्पर कुर्सम जिल्ह्यात भूखंडावरून दोन गटात वाद सुरू आहे. अगदी पाच दिवसांपूर्वी बोशेरा गावातही दोन गट आमने-सामने आले होते. यात अनेकजण जखमी झाले होते. बोशेरा गावात यापूर्वी धार्मिक गट आणि जातीय संघर्षाच्या घटना घडल्या आहेत. तसेच गावावर अनेकवेळा दहशतवादी हल्ले देखील झाले आहेत.
पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी भूखंडाच्या वादातून या भागात पुन्हा दोन गट आमने सामने आले. यावेळी त्यांच्या शाब्दिक चकमक झाली. वाद इतका विकोपाला गेला, की दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांवर धारधार शस्त्रांनी हल्ला चढवला. यात अनेक लोक मारले गेले. तर काहीजण जखमी झाले.
कुर्रमचे उपायुक्त जावेदुल्ला मेहसूद यांनी सांगितले, की जिल्ह्यात गेल्या ५ दिवसांत आदिवासींच्या संघर्षात ३६ जण ठार आणि १६२ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील इतर काही भागात अजूनही गोळीबार सुरू आहे. युद्धबंदीसाठी प्रयत्न केले जात आहेत.
आदिवासी सैनिकांनी खंदक रिकामे केले आहेत. या हिंसाचाराचे पडसाद आजूबाजूच्या परिसरात देखील उमटले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर मुख्य रस्त्यांवरही लष्कराचा मोठा फौजफाटा तैनाद करण्यात आला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांततात आहे.