नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधील सर्वपरिचित कार्यकर्ते डॉ. अमजद अयुब मिर्झा यांनी जम्मू आणि काश्मीवर लवकरच हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली. विशेष म्हणजे हा हल्ला दहशतवाद्यांकडून नव्हे तर पाकिस्तान लष्कराकडून होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मिर्झा यांच्या दाव्यानुसार पाकिस्तानच्या साधारण 600 सैनिकांनी कुपवाडा भागात घुसघोरी केली आहे.
अमझद मिर्झा यांनी केलेल्या दाव्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा कारगीलप्रमाणे युद्ध होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे एसएसजी जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल अदिल रेहमानी हे भारताच्या जम्मू या भागावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. मिर्झा यांनी केलेल्या दाव्यानुसार पाकिस्तानी लष्कराच्या संपूर्ण एसएसजी तुकडीने कुपवाडा आणि इतर भागात घुसघोरी केलेली आहे. संपूर्ण तुकडीची घुसघोरी म्हणजेच पाकिस्तानचे साधारण 600 सैनिक कुपवाडा आणि इतर भागात घुसलेले आहेत, असा दावा मिर्झा यांनी केला आहे.
तसेच, कुपवाडा तसेच इतर भागात स्थानिक जिहादी स्लिपर सेल्स हे सक्रीय झाले आहेत. स्लिपर सेल्सकडून एसएसजीच्या सैनिकांना भारतीय भूभागात घुसण्यासाठी मदत केली जात आहे. पाकिस्तानचा लेफ्टनंट कर्नल शाहीद सलीम जिंजूआ हा सध्या भारतीय हद्दीत असून पाकिस्तानी सैनिकांचे नेतृत्व करत आहे. कर्नल शाहीदकडून भारतीय लष्कराच्या 15 कॉर्प्सचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं मिर्झा म्हणाले आहेत.
दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराच्या एसएसजीच्या आणखी दोन तुकड्या मुझफराबादमध्ये सज्ज आहेत. या दोन तुकड्या जम्मू आणि काश्मीरच्या माध्यमातून भारतात घुसखोरी करण्यास सज्ज आहेत, असा दावा मिर्झा यांनी केला आहे. याआधी 40 ते 60 दहशतवादी घदाट जंगल आणि डोंगरी भागातून जम्मूत घुसले असे आम्हाला वाटले होते. पण आता लेफ्टनंट जनरल शाहीद जिंजुआ यांच्या नेतृत्त्वाखाली 500 ते 600 सैनिकांची एक तुकडी याआधीच जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसल्याचे आम्हाला समजले आहे. या सैनिकांकडून भारतीय लष्करावर हल्ले केले जात आहे, असा दावा मिर्झा यांनी केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta