पटणा : कावड यात्रेत डीजेच्या तालावर नाचत असताना विजेचा धक्का लागून ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले. ही दुर्देवी घटना बिहारच्या वैशालीनगर जिल्ह्यात रविवारी (ता. ४) रात्रीच्या सुमारास घडली. मृतांमध्ये रवी कुमार, राजा कुमार, नवीन कुमार, अमरेश कुमार, अशोक कुमार, कालू कुमार, आशू कुमार, चंदन कुमार आणि आमोद कुमार अशी अल्पवयीन मुलांची नावे आहेत. तर राजीव कुमार याच्यासह तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील सुलतानपूर परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास कावड यात्रा काढण्यात आली होती. नागरिकांसह अल्पवयीन मुले ले बाबाच्या जयघोषात डीजेच्या तालावर नाचत जात होते. यावेळी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर असलेल्या डीजेचा अचानक उच्चदाब विद्युत तारेला स्पर्श झाला. त्यामुळे ट्रॉलीत विद्युत प्रवाह उतरला. यावेळी ट्रॉलीवर उभे राहून नाचत असलेल्या ११ जणांना विजेचा जोरदार धक्का लागला त्यामुळे ते बेशुद्ध होऊन खाली कोसळले.
या घटनेनंतर नागरिकांनी मोठी आरडाओरड सुरू केली. ग्रामस्थांनी तातडीने वीजपुरवठा खंडित केला. जखमी अवस्थेत असलेल्या ११ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील ९ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अजूनही तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून या घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्याचे काम सुरू होते. या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.