ढाका : बांग्लादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. रविवारी दोन गटांत झालेल्या हाणामारीत तब्बल १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर, आतापर्यंत या हिंसारात शेकडो लोक जखमी झाले आहेत.
बांग्लादेशात पुन्हा मोठा हिंसाचार उफाळला आहे. विद्यार्थी आंदोलक, पोलीस आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर या घटनेला मोठे हिंसक वळण लागले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर बांगलादेशमध्ये अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लावण्यात आला असून इंटरनेटदेखील बंद करण्यात आले आहे. तसेच, भारत सरकारनेही या घटनेनंतर बांग्लादेशमधील भारतीय नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच, येथील भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबरदेखील जारी करण्यात आला आहे. हजारो आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. तसेच, स्टन ग्रेनेडचा वापर केला.
रविवारी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी काही नागरिकांनी अहसहकार आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार हे नागरिक या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ढाक्यातील सायन्स लॅब चौकात दाखल झाले होते. यावेळी त्यांना अवामी लीग, छात्र लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. एवढंच नाहीतर, काही आंदोलनकांनी ढाक्याच्या शाहबाग भागातील बंगबंधू शेख मुजीब वैद्यकीय महाविद्यालयासह, काही कार्यालये आणि आस्थापनांवरही हल्ले केले.