नवी दिल्ली : सिक्कीमध्ये गुरुवारी भारतीय सैन्य दलाचे वाहन ७०० ते ८०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. ही भीषण दुर्घटना सिक्कीमच्या पाकयोंग जिल्ह्यात घडली आहे. या दुर्घटनेत भारतीय सैन्य दलाच्या चार जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मदत कार्यास सुरुवात करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताचे चार जवान हे गुरुवारी पश्चिम बंगालच्या पेडोंग येथून सिक्कीमच्या पाकयोंग जिल्ह्यातील सिल्ट मार्गे जुलुक येथे जात होते. याचवेळी रेंक रोंगली राज्य महामार्गावरील दलोपचंदजवळ सैन्य दलाची गाडी ७०० ते ८०० फूट दरीत कोसळली आहे. या भीषण दुर्घटनेत भारताच्या सैन्य दलाचे जेसीओ यांच्यासहित ४ जवानांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जवानांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
अपघातात मृत पावलेले जवान देशातील विविध भागातील आहेत. मृतांमध्ये मध्य प्रदेशचे चालक प्रदीप पटेल, मणिपूरचे शिल्पाकार डब्लू पीटर, हरियाणाचे नायक गुरुसेव सिंह आणि तमिळनाडूचे सुबेदार थंगापंडी यांचा समावेश आहे. चालकासहित सर्व मृतक सैन्य दलाचे जवान हे पश्चिम बंगालच्या बिनागुडीच्या एका युनिटमध्ये सेवेत होते.
भारतीय सैन्य दलाच्या ट्रकचा वेग अधिक असल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे भीषण अपघात झाला आहे. भारतीय सैन्य दलातील ४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भारतीय सैन्याकडून शहीद जवानांचे पार्थिव त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था सुरु आहे. या भीषण अपघातात मृत्यू झाल्याची बातमी कळताच जवानांच्या घरी आणि गावात शोककळा पसरली. या घटनेने जवानांच्या कुटुंबीयांच्या सदस्यांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.