आमदार शशिकला जोल्ले; निपाणीत शिक्षक दिन
निपाणी (वार्ता) : जीवनात आई-वडिलांसह शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. शिक्षणामुळेच माणूस उच्च पदावर पोहोचणे शक्य आहे. सीमा भागातील शाळांमध्ये ३०० वर्ग खोल्या आपल्या निधीतून बांधले आहेत. यापूर्वी गुरु भवनाला निधी उपलब्ध केला आहे. आता पुन्हा १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. लवकरच गुरु भवनाची पूर्तता करू, अशी ग्वाही आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली. बेळगाव जिल्हा पंचायत, निपाणी तालुका पंचायत आणि निपाणी गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता.५) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती आणि शिक्षक दिन कार्यक्रम येथील राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनात पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी प्रास्ताविक केले. समाधी मठातील प्राणलिंग स्वामी व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन झाले.
बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारे खुली केल्याने हजारो महिला शिक्षिका बनल्या आहेत. संविधानामुळे शिक्षण क्षेत्रात अनेक बदल झाले. शिक्षणाच्या जोरावरच जात, पात, पंथ भेद दूर झाले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सातवा वेतन आयोगावर चर्चा केली आहे. लवकरच हा आयोग लागू करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे सांगितले.
तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी, शिक्षक हे जीवनाचे मार्गदर्शक व समाजाचे आधारस्तंभ आहेत. गुरुमुळेच जीवनाची प्रगती होत असून त्यांना कधीही न विसरण्याचे आवाहन केले. प्राणलिंग स्वामी यांनी शिक्षणाबरोबरच संस्कार ही महत्त्वाची असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष सोनल कोठडीया यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक आणि गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.
कार्यक्रमास उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, नगरसेवक जयवंत भाटले, नगरसेविका गीता पाटील, कावेरी मिरजे, अरुणा मुदकुडे, सुजाता कदम, राजेश कोठडीया, राजगौडा कागे, एम. वाय. गोकार, सदाशिव वडर, पी. पी. कांबळे, तेजस्विन बेळगली, सुरेश कांबळे, भास्कर स्वामी, सुनील शेवाळे, वाय.बी. हंडी, सुनील जनवाडे, प्रशांत रामणकट्टी, एन. जी. अत्तार, सदाशिव तराळ, एसएम पडलीहाळे, सदाशिव यल्लटी, बाबुराव मलाबादे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.