Sunday , June 28 2026
Breaking News

तामिळनाडूची सत्ता नव्या ‘थलापती’कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग

Spread the love

 

नवी दिल्ली : अभिनेते विजय यांच्या ‘तामिळगा वेत्री कळघम’ पक्षाला तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मिळालेलं अभूतपूर्व यश अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. त्यांनी तब्बल पाच दशकांच्या… दोन अक्षांमध्ये विभागल्या गेलेल्या द्रविडी राजकारणाचे चक्र भेदलं आहे. तामिळनाडूचा निकाल हा केवळ प्रस्थापितविरोधी नाही, तर त्याच-त्याच चेहऱ्यांना कंटाळलेल्या जनतेचा हा कौल आहे. तेच डीएमके, एआयएडीएमके पक्ष आणि तेच-तेच चेहरे नाकारून तमिळनाडूच्या मतदारांनी ताज्या दमाच्या नेत्याचा, ताज्या दमाचा पक्ष सत्तेजवळ नेऊन ठेवला आहे.

फारशी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या विजय यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर हे चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनीही राजकीय पक्ष, राजकीय संघटना बांधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना त्यात फारसे यश आले नाही. त्यांच्या मुलानं मात्र पहिल्याच फटक्यात तामिळी राजकारणातल्या धुरंधर नेत्यांना चारी मुंड्या चित केले आहे. प्रस्थापित नेत्यांवर सातत्याने होणारे भ्रष्टाचाराचे आरोप आणि विजय यांची कोरी राजकीय पाटी हे समीकरण जुळून आल्याने तामिळनाडूत हा चमत्कार बघायला मिळाला.

विजय यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर म्हणाले की, “गेल्या 30 वर्षापासून विजय तामिळ लोकांसाठी काहीतरी करायचं असा विचार करतोय. त्याच विचारातून त्याने राजकारणात प्रवेश केला. आता तो तामिळनाडूचा मुख्यमंत्री होईल, तामिळ लोक त्याच्यावर भरभरून प्रेम करतील.”

सिनेमाचा राजकारणावर प्रभाव
दक्षिण भारतात, त्यातही तामिळनाडूत सिनेमा हा राजकारणाचं एक हत्यार राहिला आहे. एम.जी. रामचंद्रन किंवा एमजीआर हे प्रख्यात अभिनेते या मालिकेतलं पहिलं नाव. त्यांच्याच सहकलाकार राहिलेल्या जे. जयललिता यांनीही दीर्घकाळ तामिळनाडूचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. एम. करुणानिधी यांची कलाकार म्हणून कारकीर्द नसली, तरी तेदेखील चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. अगदी अलिकडे कमल हासन यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली, मात्र त्यांना अजून फारसं यश आलेलं नाही.

थलैवा ‘रजनीकांत’ यांनीही राजकारणात पाय रोवण्याचा प्रयत्न केला. मात्र तेदेखील अद्याप चाचपडतच आहेत. असं असताना विजय यांनी मात्र पहिल्याच फटक्यात थेट सत्तेच्या जवळ जाऊन पोहोचण्याचा नवा चमत्कार घडवला.

विजय यांच्या पक्षाने विजयाकडे वाटचाल सुरू केल्यानंतर चेन्नईमधल्या त्यांच्या कुटुंबीयांनी एकच जल्लोष केला. आता तामिळनाडूत सत्तांतराबरोबरच अनेक सकारात्मक बदल होतील, अशी ग्वाहीदेखील विजय यांच्या वतीने दिली.

About Belgaum Varta

Check Also

दूधसागर नदीत चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; तिघे सख्खे भाऊ

Spread the love  पणजी/कुळे : सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांच्या सहलीचा शेवट हृदयद्रावक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *