Sunday , June 28 2026
Breaking News

पुण्यातील यशस्वी उद्योजक शिवानंद चन्नेवाडकर यांचा खानापूर तालुक्यातील तरुणांना आदर्शपाठ

Spread the love

 

माता-पित्यांच्या स्मरणार्थ गर्बेनहट्टीतील गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार स्कूल बॅगचे वाटप

खानापूर : आजच्या काळात जेव्हा राजकारणी मंडळी निवडणूक, पद, प्रतिष्ठा आणि मानपान डोक्यात ठेवून तात्पुरते, दिखाऊ सामाजिक उपक्रम राबवताना दिसतात, अशा काळात कोणतीही प्रसिद्धीची हाव न ठेवता, केवळ आपल्या जन्मभूमीप्रती असलेली कृतज्ञता आणि आई-वडिलांचे संस्कार जपणारी माणसे विरळीच असतात. पुण्यातील कात्रज (दत्तनगर) येथील ‘एस एस इंडस्ट्रीज’ या सीएनसी कारखान्याचे सर्वेसर्वा शिवानंद रुद्रप्पा चन्नेवाडकर हे अशाच एका संवेदनशील आणि दानशूर व्यक्तिमत्त्वाचे नाव आहे.
आपल्या यशाची शिखरे पादाक्रांत करताना आपली नाळ मातीशी घट्ट ठेवत, शिवानंद यांनी यावर्षीही आपल्या गर्बेनहट्टी (ता. खानापूर) या जन्मगावी अनोखा ऋणानुबंध जपला आहे. आपले पूजनीय वडील कै. रुद्रप्पा होनाप्पा चन्नेवाडकर यांच्या पवित्र स्मृती प्रित्यर्थ आणि मातोश्री जानकूबाई रुद्रप्पा चन्नेवाडकर यांच्या प्रेरणेने व संस्कारातून, त्यांनी गावातील मराठी शाळेत शिकणाऱ्या ४० वंचित व गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार, ब्रँडेड कंपनीच्या स्कूल बॅगचे वाटप केले. नवीन कोऱ्या बॅग हातात पडताच या चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर जे निखळ हसू फुलले, ते चन्नेवाडकर यांच्या निस्वार्थी सामाजिक बांधिलकीची आणि त्यांच्या माता-पित्यांनी दिलेल्या परोपकारी विचारांची पावती देणारे होते.
शिवानंद चन्नेवाडकर यांचा हा जीवनप्रवास आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि स्फूर्ती देणारा आहे. कारण, आज ज्या सुख-सुविधा आणि यश त्यांच्याकडे आहे, कधीकाळी या गोष्टी त्यांच्यासाठी अत्यंत दूरच्या आणि स्वप्नवत होत्या. गरिबीचे चटके सोसत, सुमारे तीस वर्षांपूर्वी केवळ रोजीरोटी कमवण्याच्या उद्देशाने त्यांनी आपले मूळ गाव सोडले होते. सुरुवातीला बेळगाव येथील ‘बेम्को’ कंपनीत आणि त्यानंतर हुबळी येथे त्यांनी मिळेल ते काम करून पोटाची खळगी भरली. पण डोक्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. शेकडो किलोमीटर दूर पुण्यासारख्या अनोळखी शहरात जाऊन, सुरुवातीला एका मित्राच्या मदतीने त्यांनी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. रात्रंदिवस केलेले अथक परिश्रम, प्रामाणिकपणा आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती यांच्या जोरावर त्यांनी ‘एस एस इंडस्ट्रीज’चा पाया रचला. आज त्यांनी व्यवसायात स्वतःचा उत्तम स्थान निर्माण केला असून, पुणे सारख्या औद्योगिक शहरात ते एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास आले आहेत. शून्यातून विश्‍व कसं निर्माण करावं, याचं शिवानंद हे चालतं-बोलतं उदाहरण आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, यशाच्या अथांग आकाशात झेप घेत असतांना शिवानंद हे आपले पाय जमिनीवर ठेवून आहेत. अनेक लोक शहरात स्थायिक झाल्यावर आपल्या गावाला, तिथल्या माणसांना आणि आपल्या कष्टाच्या दिवसांना विसरून जातात. परंतु, शिवानंद यांनी आपल्या यशाचा वाटा आपल्या जन्मभूमीतील वंचित मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचा घेतलेला वसा अत्यंत कौतुकास्पद आहे. आपले वडील रुद्रप्पा होनाप्पा चन्नेवाडकर आणि माता जानकुबाई रुद्रप्पा चन्नेवाडकर यांनी दिलेली शिकवण डोळ्यांसमोर ठेवून, दरवर्षी नियमितपणे गावातील मराठी शाळेत जाऊन शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे, हे त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देते. आजच्या कमवत्या आणि सुशिक्षित तरुणांनी शिवानंद चन्नेवाडकर यांचा हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवण्याची गरज आहे. आपण ज्या मातीत वाढलो, ज्या शाळेत शिकलो, तिचे आपण काहीतरी देणे लागतो, ही जाणीव प्रत्येकाने ठेवली तर गावातील एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही. स्वतःच्या कष्टाने आणि जिद्दीने आपले नशीब बदलणाऱ्या आणि आपल्यासोबतच गावातील मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी झटणाऱ्या शिवानंद चन्नेवाडकर यांच्या या स्तुत्य कार्याला संपूर्ण खानापूर तालुक्यातून मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

About Belgaum Varta

Check Also

शिवाजीनगर अपघातातील जखमी सेवानिवृत्त पोस्टमास्तर मारुती दळवी यांचे निधन; मणतुर्गा येथे आज अंत्यसंस्कार

Spread the love  खानापूर : खानापूर शहरातील शिवाजीनगर परिसरात दोन दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात गंभीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *