Thursday , August 20 2026
Breaking News

मोहरम, शाहू जयंतीनिमित्त वृक्षारोपणातून सामाजिक सलोख्यासह पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : धर्म, जात, पंथ आणि विचारांच्या सीमा ओलांडून जेव्हा समाज एकत्र येतो आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवागार वारसा निर्माण करण्याचा संकल्प करतो. तेव्हा अशा उपक्रमातून समाजपरिवर्तनाची नवी दिशा निर्माण होते. याच भावनेतून मोहरम आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने नेसरीकर प्लॉट येथे “भूमी वात्सल्य फाउंडेशन”तर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून सामाजिक ऐक्य, पर्यावरण संवर्धन आणि मानवतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.
पर्यावरणप्रेमी शिक्षक भूमी वात्सल्य फाउंडेशनचे संस्थापक नामदेव चौगुले यांनी ९ ते १० फूट उंचीची वृक्षरोपे भेट देऊन प्रस्तावित ऑक्सिजन पार्कच्या उभारणीसाठी मोलाचे योगदान दिले. भविष्यात हा परिसर हिरव्यागार वृक्षांनी भरण्यासह पक्षांच्या किलबिलाटाने गजबजलेला आणि नागरिकांना शुद्ध प्राणवायू देणारा “ऑक्सिजन पार्क” म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
प्रारंभी महिलांनी वृक्षरोपांची विधिवत पूजा करून त्यांना जीवन, समृद्धी आणि पर्यावरणाचे प्रतीक मानत संवर्धनाचा संकल्प केला. वृक्षांना देवत्व मानणाऱ्या भारतीय संस्कृतीचा प्रत्यय या प्रसंगी उपस्थितांना आला.
यावेळी जेम्स सत्तेगिरी यांनी पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांचे गुलाबरोप भेट देऊन स्वागत केले. तर सलमा शेख यांनी विद्या पाटील यांना गुलाबरोप देऊन सन्मानित केले.
नामदेव चौगुले म्हणाले, आज जगासमोर प्रदूषण आणि हवामान बदलाचे संकट उभे राहिले आहे. यावर उपाय म्हणून प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. सण-उत्सव आणि कौटुंबिक समारंभ या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला जर आपण वृक्षारोपणाची जोड दिल्यास भविष्यातील पिढ्यांना शुद्ध हवा आणि समृद्ध पर्यावरणाचा अनमोल वारसा देणे शक्य असल्याचे सांगितले.
माजी उपनगराध्यक्ष झाकीर कादरी यांच्या नेतृत्वाखाली नेसरीकर प्लॉटमध्ये ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष झाकीर कादरी, अल्पसंख्याक सेलच्या उपाध्यक्षा सलमा शेख, राजू जत्राटे, शोभा जत्राटे, मंजुनाथ जाधव, सुजाता जाधव, अन्वरबी जमदार, सहिरा इनामदार, अलका चौगुले, मज्जीद भगवान, सुलेमान शेख, शौकत इनामदार, रफिक सरखवास, सई जाधव, भगवंत कुरणे आणि वंदना कुरणे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पहिल्या श्रावण सोमवारी शिवालये गजबजली

Spread the love  दर्शनासाठी दिवसभर गर्दी : विविध ठिकाणी शाबू खिचडीचे वाटप निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *