Wednesday , August 19 2026
Breaking News

पंढरपूरजवळ भीषण दुर्घटना; भाविकांचा टेम्पो विहिरीत कोसळून १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

 

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-म्हसवड मार्गावर रविवारी सकाळी हृदयद्रावक दुर्घटना घडली. सिद्धनाथांच्या दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांचा टेम्पो माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळील विहिरीत कोसळल्याने १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविकांचा समूह सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेला होता. दर्शन आटोपून गावाकडे परतत असताना भरधाव टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळले. अपघात इतका भीषण होता की अनेकांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.

घटनेची माहिती मिळताच तांदूळवाडी ग्रामस्थ, पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून बचावकार्य काही काळ सुरू होते.

या दुर्घटनेतील सर्व मृत भाविक रांजणी गावातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही मृत एकाच कुटुंबातील असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मृतांची अधिकृत यादी प्रशासनाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

या भीषण दुर्घटनेमुळे रांजणी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, उघड्या आणि असुरक्षित विहिरींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

टँकरची ऑटो रिक्षाला धडक; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love  शेतीचे काम आटोपून घरी परतणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला; ७ हून अधिक जण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *