Wednesday , August 19 2026
Breaking News

मुजोरीला कंटाळलेल्या शेतकऱ्याचा संताप अनावर

Spread the love

 

 

अधिकाऱ्याला चपलेने मारहाण; भरपाईसाठी हेलपाटे मारूनही न्याय नाही

बंगळूर : जमीन संपादित करून अनेक वर्षे उलटूनही भरपाई न मिळाल्याने संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने बागलकोट येथे अधिकाऱ्याला चपलेने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बागलकोट शहराला जोडणाऱ्या रस्ते प्रकल्पासाठी २००४ मध्ये दादेनवर सर्कल परिसरातील शेतकरी बसवराज दोड्डमणी यांची जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र, जमीन संपादनानंतरही योग्य आणि वेळेवर भरपाई न मिळाल्याने ते अनेक वर्षांपासून प्रशासनाच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवत होते. भरपाई प्रक्रियेत होत असलेल्या विलंबामुळे आणि अपुऱ्या मोबदल्यामुळे ते प्रचंड नाराज होते.

दरम्यान, शुक्रवारी बीटीडीए कार्यालयात सफाई कर्मचाऱ्यांना भूखंड वाटप न केल्याच्या निषेधार्थ दलित संघर्ष समितीच्या (डीएसएस) कार्यकर्त्यांनी कार्यालयाला घेराव घालून आंदोलन सुरू केले होते. गेल्या एका वर्षापासून १५ सफाई कर्मचाऱ्यांना मंजूर भूखंडांचा ताबा देण्यात आलेला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

याच वेळी कार्यालयात आलेल्या बसवराज दोड्डमणी यांनीही आपली व्यथा मांडली. “माझी जमीन बुडीत क्षेत्रात गेल्यानंतर अनेक वर्षे झाली, तरीही मला भरपाई मिळालेली नाही. भरपाईसाठी वारंवार कार्यालयात फेऱ्या मारून मी थकलो आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

शेतकरी दोड्डमणी यांचा संताप व्यक्त होत असताना बीटीडीए कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक व टायपिस्ट नीलकंठ अंकद यांच्याशी त्यांचा वाद झाला. दोघांमध्ये शाब्दिक चकमक वाढत गेल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले. अखेर संताप अनावर झालेल्या दोड्डमणी यांनी पायातील चप्पल काढून नीलकंठ अंकद यांना सर्वांसमोर मारहाण केली.

या अचानक घडलेल्या प्रकारामुळे कार्यालय परिसरात एकच गोंधळ उडाला. काही काळ कार्यालयीन कामकाजात व्यत्यय आला असून उपस्थितांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. जमीन संपादनानंतरही वर्षानुवर्षे भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये वाढत चाललेली नाराजी आणि प्रशासनावरील अविश्वास या घटनेतून पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाची दखल घेऊन योग्य तो निर्णय घेतला जातो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

नागेंद्र यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

Spread the love विधानसभेत, विधान परिषदेतही गदारोळ बंगळूर : वाल्मीकी विकास महामंडळातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *