Wednesday , August 19 2026
Breaking News

प्लास्टिकमुक्तीचा संदेश देत जायंट्स मेनतर्फे खासबाग आठवडी बाजारात ८५० कापडी पिशव्यांचे वाटप

Spread the love

 

बेळगाव : वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यास निर्माण होणाऱ्या गंभीर धोक्यांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने खासबाग येथील आठवडी बाजारात सुमारे ८५० कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

आठवडी बाजारात भाजीपाला, फळे व इतर वस्तू खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना कापडी पिशव्या देत प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले. प्लास्टिकमुळे माती, पाणी आणि हवा प्रदूषित होत असून त्याचा परिणाम थेट मानवी आरोग्यावर होत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने दैनंदिन जीवनात कापडी पिशव्यांचा वापर करून पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लावावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी जायंट्स मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “प्लास्टिकचा वाढता वापर ही आज देशासमोरील एक गंभीर समस्या बनली आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून जनावरे, पक्षी आणि जलचर यांचे जीवन धोक्यात आले आहे. याशिवाय प्लास्टिकमधून निर्माण होणारे सूक्ष्म कण अन्नसाखळीत प्रवेश करून मानवी आरोग्यासाठी घातक ठरत आहेत. त्यामुळे प्लास्टिकमुक्त भारत ही केवळ शासनाची मोहीम नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपण सर्वांनी प्लास्टिक पिशव्यांना कायमचा नकार देऊन कापडी पिशव्यांचा स्वीकार केल्यास पर्यावरण संरक्षणाबरोबरच आपले आरोग्यही सुरक्षित राहील.”

“प्लास्टिक हटावो – आरोग्य बचाओ” हा संदेश देत त्यांनी नागरिकांना पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले.

या उपक्रमासाठी जायंट्स मेनचे माजी अध्यक्ष उमेश पाटील यांनी आर्थिक सहकार्य केले. त्यांच्या योगदानाबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
नागरिकांनाही प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक जनजागृतीसाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमात जायंट्स मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, उपाध्यक्ष अरुण काळे, फेडरेशन संचालक सुनिल मुतगेकर, माजी अध्यक्ष शिवराज पाटील, अशोक हलगेकर, सचिव विश्वास पवार, विनोद आंबेवाडीकर, ईश्वर पाटील, आनंद कुलकर्णी, मंजुनाथ शिरोडकर, राजू बांदिवडेकर, राजू जैन, महादेव भस्मे, सुनिल मुरकुटे, विजय बन्सुर, राहूल बेलवलकर, हिरालाल चव्हाण आदि उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

हिडकल जलाशयाची सुरक्षा रामभरोसे!

Spread the love  २० हून अधिक कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; मुख्य प्रवेशद्वाराची दुरवस्था, प्रवेश नियंत्रणही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *