

नवी दिल्ली : देशभरात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी “2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणारच”, असा ठाम निर्धार व्यक्त करत देशाच्या विकासाचा रोडमॅप आणि गेल्या काही वर्षांतील प्रगतीची आकडेवारी मांडली.
पंतप्रधान मोदी यांनी यंदा सलग १३ व्यांदा लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले. देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना त्यांनी स्वातंत्र्यसैनिक आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या महान क्रांतिकारकांना अभिवादन केले.
मोदी म्हणाले, “आज घराघरात तिरंगा आहे आणि प्रत्येक मनात तिरंगा आहे. देश मोठ्या उत्साहाने नवीन संकल्प घेऊन पुढे जात आहे.” मोठी स्वप्ने आणि दृढ संकल्प यांच्याच बळावर राष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करते, असे त्यांनी सांगितले.
2047 चे लक्ष्य; विकसित भारताचा संकल्प
भारताच्या स्वातंत्र्याला 2047 मध्ये 100 वर्षे पूर्ण होतील. त्यावेळी भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प आपण केला असून, हा संकल्प पूर्ण करून दाखवणार असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.
“देश जेव्हा मोठे स्वप्न पाहतो, तेव्हा त्याचे विचारही मोठे होतात. मोठे लक्ष्य समोर ठेवले की प्रयत्नांची ताकद वाढते आणि स्वप्न साकार करण्याचा मार्ग मोकळा होतो,” असे मोदी म्हणाले.
देशाच्या काही भागांत आलेल्या पूर आणि भूस्खलनाचा उल्लेख करत त्यांनी बाधित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केली. संकटाच्या काळात संपूर्ण देश पीडितांच्या पाठीशी असल्याचा विश्वासही त्यांनी दिला.
“१४० कोटी भारतीयांचा संकल्प देशाला पुढे नेईल”
भारताची सर्वाधिक लोकसंख्या ही देशाच्या विकासासाठी मोठी ताकद ठरू शकते. १४० कोटी भारतीयांनी विकासाचा संकल्प केल्यास 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न निश्चितपणे साकार होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

Belgaum Varta Belgaum Varta