Sunday , August 16 2026
Breaking News

सात वर्षे खड्ड्यात गेलेल्या प्रशासनाचे आश्वासन; जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीआधी गुडशेड रोडवर जेसीबी

Spread the love

 

रहिवाशांच्या संतापानंतर महापालिकेची धावपळ; तात्पुरती मलमपट्टी नको, कायमस्वरूपी रस्त्याची मागणी

बेळगाव : गेल्या तब्बल सात वर्षांपासून गुडशेड रोडच्या दुरवस्थेचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांच्या संयमाचा अखेर बांध फुटला. शास्त्रीनगर, गुडशेड रोड, संतसेना रोड, आठले गल्ली, कपिलेश्वर कॉलनी आणि परिसरातील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत रस्त्याच्या समस्येवर तातडीने आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली.

गेल्या सात वर्षांत महापालिकेकडे असंख्य अर्ज, निवेदने आणि पाठपुरावा करूनही रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’च राहिली. खड्डे, धूळ, चिखल आणि वाहतुकीच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले. मात्र प्रशासनाच्या दप्तरी या समस्येची दखल घेतली जात नसल्याचा संताप नागरिकांमध्ये वाढत होता.

नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत दुपारी १२ ते ३ या वेळेत स्वतः घटनास्थळी पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. आणि त्यानंतरच प्रशासनाची यंत्रणा अचानक जागी झाली!

जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीपूर्वीच, शासकीय सुट्टीच्या दिवशी गुडशेड रोडवर जेसीबी धावू लागला. रस्त्याचे खुरडणे आणि समतलीकरण सुरू करण्यात आले. सात वर्षे नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीची चाहूल लागताच अचानक रस्ता आठवला, असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.

सात वर्षे झोपलेले प्रशासन अचानक जागे कसे झाले?

गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिक सातत्याने रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करीत होते. त्या वेळी महापालिका प्रशासनाने तत्परता का दाखवली नाही? जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीपूर्वीच काम सुरू करण्याची घाई का झाली? नागरिकांच्या मागणीपेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाहणी महत्त्वाची होती का? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने देणे गरजेचे आहे.

तरीही, उशिरा का होईना, प्रशासन जागे झाले हे स्वागतार्हच! जेसीबीने सुरू केलेल्या कामामुळे नागरिकांना सध्या काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र ही केवळ तात्पुरती मलमपट्टी ठरू नये, एवढीच अपेक्षा आहे.

खुरडणे नव्हे, कायमस्वरूपी रस्ता हवा!

गुडशेड रोडची समस्या केवळ रस्ता समतल करण्यापुरती मर्यादित नाही. पावसाळ्यात पाणी साचणे, खड्डे पडणे आणि रस्ता खराब होण्यामागील कारणांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

सात वर्षांचा त्रास सहन केलेल्या नागरिकांना आता आणखी आश्वासने नकोत; प्रत्यक्ष आणि दर्जेदार काम हवे आहे.

महापालिकेने सुरू केलेल्या प्राथमिक कामाबद्दल नागरिकांनी आभार मानले असले तरी, त्यापुढील टप्प्यात रस्त्याचे मजबुतीकरण, योग्य ड्रेनेज व्यवस्था आणि दर्जेदार डांबरीकरण करून हा प्रश्न कायमचा निकाली काढावा.

सात वर्षे प्रतीक्षा झाली. आता आणखी प्रतीक्षा नको!

गुडशेड रोडला तात्पुरती मलमपट्टी नव्हे, कायमस्वरूपी आणि सुरक्षित रस्ता मिळायलाच हवा. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन काम केवळ कागदावर नव्हे, तर प्रत्यक्षात पूर्ण करून दाखवावे, अशी जोरदार मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *