
नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा एकदा महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. 14.2 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे आजपासून घरगुती सिलिंडरची किंमत 999.50 रुपये असणार आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच जनता हैराण असतानाच सिलिंडरच्या दरात ही वाढ झाली आहे. एलपीजीच्या दरवाढीमुळे भारतातील सर्वसामान्यांच्या त्रासात भर पडणार आहे.
इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. त्यात आता गॅस महागला आहे. याआधी व्यावसायिक सिलिंडर महाग झाला होता. याआधी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती 102 रुपयांनी वाढल्या होत्या. एप्रिल महिन्यात या किंमतीमध्ये 268 रुपयांनी वाढ झाली होती. त्यात पुन्हा मे महिन्याच्या सुरुवातीला त्यात वाढ झाली होती. एकीकडे व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती वाढल्या असताना आता घरगुती सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे गृहिणींचे घरगुती बजेट कोलमडले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. 1 मे रोजी, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 102.50 रुपयांनी वाढून 2355.50 रुपये झाली, जी पूर्वी 2253 रुपये होती. तसेच, 5 किलोच्या एलपीजी व्यावसायिक सिलिंडरची किंमत 655 रुपये करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta