जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होऊ शकते. रिपब्लिक टीव्ही मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलमध्ये हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एक्झिट पोलनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला २८ ते ३० जागा मिळू शकतात. तर इंडिया आघाडीतील मित्र पक्ष नॅशनल कॉन्फरन्सलाही इतक्याच जागा मिळताना दिसत आहे.
तसेच काँग्रेसलाही ३ ते ६ जागा मिळू शकतात. याशिवाय स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या पीडीपीलाही ५ ते ७ जागा मिळू शकतात. या एक्झिट पोलनुसार, इंडिया आघाडीला जम्मू-काश्मीरमध्ये स्वबळावर ९० जागांसह ३६ जागा मिळू शकतात. तर सरकार स्थापन करण्यासाठी किमान ४६ जागा मिळायला हव्यात. अशातच पीडीपीही इंडियाआघाडीसोबत येऊ शकते. याबाबतचे संकेत दोन्ही बाजूंकडून यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्ससाठी एक्झिट पोलचे अंदाज आनंदाची बातमी घेऊन आले आहेत.
भाजपसाठी चिंतेची बाब म्हणजे जम्मूमध्ये त्यांना एकूण ४३ पैकी ३० जागा मिळू शकतात, मात्र काश्मीरमध्ये त्यांचं खातं उघडणं कठीण दिसत आहे. तर जम्मू भागात नॅशनल कॉन्फरन्सला ११ ते १५ जागा मिळण्याची शक्यता आहे. जम्मूमध्येही नॅशनल कॉन्फरन्सला ७ हून अधिक जागा मिळू शकतात.
इंडिया टुडे-सी व्होटर एक्झिट पोल
यातच इंडिया टुडे-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-एनसी आघाडीला बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. एक्झिट पोलनुसार, काँग्रेस-एनसी आघाडीला ४०-४८ जागा, भाजपला २७-३२, पीडीपीला ६-१२ आणि इतरांना ६-११ जागा मिळण्याची शक्यता आहे.
पीपल्स पल्सच्या एक्झिट पोल
पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला २३-२७ जागा मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेस-एनसी आघाडीला ४६-५० जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर इतरांच्या खात्यात ४-६ जागा आणि पीडीपीच्या खात्यात ७-११ जागा येण्याची शक्यता आहे.