जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा यंत्रणांना मोठं यश आले आहे. ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. अखनूर परिसरात सुरक्षा यंत्रणांनी ही मोठी कारवाई केली आहे. अखनूर भागात दहशतवाद्यांनी जवानांच्या रूग्णवाहीकेवर गोळीबार केला होता. त्यानंतर जवानांनी सर्च ऑपरेशन करत ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये सकाळी झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. अखनूर सेक्टरमधील एका गावात हे तीन दहशतवादी लपून बसले होते. यावेळी झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांना जवानांनी ठार केले. परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांविरोधातील कारवाई पुन्हा एकदा तीव्र करत असताना सुरक्षा दलांनी हा हल्ला केला. तिन्ही दहशतवादी मारले गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तिसरा दहशतवादी जोगवान गावातील असून मंदिराजवळील जंगल परिसरात लपला होता. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराने बीएमपी-२ टँक घटनास्थळी तैनात केले होते.
सोमवारी सकाळी नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा दलांच्या ताफ्याला घेऊन जाणाऱ्या लष्कराच्या रुग्णवाहिकेवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. तीन दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी विशेष दल आणि एनएसजी कमांडोने सुरू केलेल्या कारवाईत संध्याकाळी ठार झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी मंगळवारी सकाळी ७ वाजता खौरच्या भटाल परिसरामध्ये लपलेल्या दहशतवाद्यांवर हल्ला केला. त्यानंतर पुन्हा चकमक सुरू झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, भीषण गोळीबारानंतर जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले. यानंतर सुरक्षा दलांनी आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. २७ तास चाललेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तिसऱ्या दहशतवाद्यालाही ठार केले.
तर घटनास्थळी लपून बसलेल्या तिसऱ्या दहशतवाद्याला कंठस्नान करण्यासाठी जवानांनी अधूनमधून गोळीबार केला. चार वर्षांचा शूर आर्मी डॉग ‘फँटम’ या ऑपरेशन दरम्यान गोळी लागून ठार झाला. ही पहिलीच वेळ आहे की लष्कराने आपली चार बीएमपी २ पायदळ लढाऊ वाहने पाळत ठेवण्यासाठी आणि हल्ल्याच्या ठिकाणाभोवती बळकट करण्यासाठी तैनात केली होती आणि लपलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोन देखील तैनात केले होते.