पणजी : पद्मिनी फाऊंडेशनद्वारे महिला सक्षमीकरणावर केंद्रित एक समुदाय आधारित कार्यक्रम शनिवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता पाळी येथील श्री नवदुर्गा देवी सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या समाजसेविका सौ. अनिता सुदेश कवळेकर आणि प्रमुख वक्ते श्री. नवनाथ रामकृष्ण मुळवी यांच्यासह पाळी गावचे सरपंच श्री. संतोष नाईक, श्री नवदुर्गा देवस्थानचे अध्यक्ष श्री. अजित वासुदेव गावस, पंचसदस्या सौ.प्रशिला गावडे, श्री सातेरी सेल्फ हेल्प ग्रुपच्या सौ.सुप्रिया सुभाष गावस, ज्येष्ठ नागरिक श्री. अनंत गावस उपस्थित होते. सुरुवातीला हिंदु संस्कृतीनुसार पाहुण्याचे पंचारती ओवाळून सुहासिनी हस्ते स्वागत करण्यात आले. नंतर पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व पाहुण्यांना स्वागतपर भेटवस्तू देण्यात आल्या आणि कार्यक्रमाला औपचारीक सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्या सौ. अनिता कवळेकर यांनी महिलांसाठी बहुमोल असे विचार मांडले. त्यानंतर पंचसदस्या सौ. प्रशिला गावडे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.
त्यानंतर ‘नारी शक्ती’ या विषयावर आधारित एक खेळ सभागृहात जमलेल्या महिलांसाठी आयोजित करण्यात आला आणि विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. प्रमुख वक्ते श्री. नवनाथ मुळवी यांनी महिलांना उद्देशून “नारी शक्ती एकवटली” या शब्दांत त्यांचे अभिनंदन केले आणि स्त्री शिक्षण व सक्षमीकरणावर उपयुक्त मार्गदर्शन केले. तसेच, त्यांनी मुलांना आर्टस्, कॉमर्स, सायन्स व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षांची तयारी व त्याचे फायदे याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे महत्व पटवून दिले आणि कंपेटिटीव परीक्षांसाठी मुला मुलींना शिकवणीत मोलाचे सहकार्य करणाऱ्या बेतोडा फोंडा येथील “केशव सेवा साधना” या संस्थेचा ऊल्लेख केला.
सरपंच श्री.संतोष नाईक यांनी सांगितले की, पद्मिनी फाऊंडेशन हा ट्रस्ट माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत यांच्या मातोश्री स्व. पद्मिनी पांडुरंग सावंत यांच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आला आहे. ट्रस्ट प्रमुख सौ. सुलक्षणा प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी सरपंचांनी महिलांना खानपानाविषयी देखील मार्गदर्शन केले.
त्यानंतर सातेरी सेल्फ हेल्प ग्रुपच्या सौ.सुप्रिया सुभाष गावस यांनी “शूर आमी सरदार” हे गाणे सादर केले व वाहवा मिळविली. सूत्रसंचालन कु.हर्ष अनिल गावस यांनी अत्यंत उत्कृष्टपणे केले आणि त्यांच्या अप्रतिम सुत्रसंचालनाने कार्यक्रमाची वैशिष्ट्ये अधोरेखित झाली. कार्यक्रमाच्या शेवटी सातेरी सेल्फ हेल्प ग्रुपच्या हरहुन्नरी सामाजिक कार्यकर्त्या सौ. श्रिवानी चंद्रशेखर नाईक यांनी सुबकरित्या आभारप्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयुशा गावस यांच्यासह रोहन गावडे, अभिजित गावस, परेश गावस, रुपा च्यारी, अवीद गावडे, नितीन च्यारी, वनिता देविदास, योजना गावस, मंदा देविदास, श्रीशा गावडे, अनिल गावडे या सर्वानी बरेच परिश्रम घेतल्याने कार्यक्रम यशस्विरित्या पार पडला त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे हे विशेष.