अमृतसर : सुवर्ण मंदिराबाहेर झालेल्या गोळीबारातून अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांचा जीव थोडक्यात बचावला आहे. बुधवारी पहाटे सुखबीर सिंह बादल यांना गोळ्या घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्लेखोराच्या गोळीबारानं सुवर्ण मंदिराबाहेर खळबळ उडाली. मात्र, तिथे उपस्थित लोकांनी हल्लेखोराला पकडलं. सुखबीर सिंह बादल यांच्यावर हा जीवघेणा हल्ला तेव्हा झाला, जेव्हा ते सुवर्ण मंदिराच्या बाहेर द्वारपाल म्हणून धार्मिक शिक्षा भोगत होते.
अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल द्वारपाल म्हणून सेवा करत होते, त्याचवेळी गोळीबार करण्यात आला. ते सुवर्ण मंदिराच्या दरबार साहिबच्या गेटवर द्वारपाल म्हणून काम करत होते. तेवढ्यात समोरून हल्लेखोर आला आणि त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. सुखबीर सिंह बादलच्या शेजारी उभ्या असलेल्या एका सैनिकानं हल्लेखोराला थांबवलं आणि गोळी झाडली. मात्र, ही गोळी कोणालाही लागली नाही.
त्यानंतर सुरक्षारक्षकांनी आरोपीला पकडलं. ज्या ठिकाणी गोळीबार झाला, त्याचवेळी तिथे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल उपस्थित होते. या हल्ल्यात जीवीतहानी झालेली नाही. हल्लेखोर खलिस्तानी कारवायांमध्ये सामील असल्याचं सांगण्यात येत आहे. नारायण सिंह चौडा असं आरोपीचं नाव आहे. आरोपींवर यापूर्वीही अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे.
Belgaum Varta Belgaum Varta