नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह देशभरातील नेते आणि मान्यवरांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे अंतदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. गुरुवारी रात्री १० वाजून ०१ मिनिटांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना मोतीलाल नेहरु मार्गावरील घरी आणण्यात आले. शुक्रवारी सकाळीपासून नेते आणि मान्यवरांनी त्यांच्या घरी येऊन अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली आहे. सर्व मान्यवरांनी मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरशरण सिंग आणि कुटुंबियांचे सांत्वन करुन संवेदना व्यक्त केल्या.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामण, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी, काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल, दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुखु, यांच्यासह अनेक सर्व पक्षांतील विविध नेते आणि मान्यवरांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली.
Belgaum Varta Belgaum Varta