नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि देशाचे थोर अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर दिल्लीच्या निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या या ‘अर्थभास्करा’ला अखेरची मानवंदना देण्यासाठी देशभरातील नेते, विविध क्षेत्रातील तज्ज्ञमंडळी उपस्थित होती. जगातील नेत्यांनीही डॉ. सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.
डॉ. मनमोहन सिंग यांचं गुरुवारी (२६ डिसेंबर) रात्री दिल्लीत निधन झालं. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात आज (२८ डिसेंबर) अंत्यसंस्कार करण्यात आले. देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी मनमोहन सिंग यांचे अंत्यदर्शन घेतले.
सर्वसामान्य नागरिकांना डॉ. सिंग यांचे अंत्यदर्शन घेता यावे यासाठी त्यांचे पार्थिव सकाळी आठ-नऊच्या सुमारास काँग्रेस मुख्यालयात ठेवण्यात आले. तेथे काँग्रेसच्या मुख्य नेत्यांसह अनेक कार्यकर्ते होते. साडेनऊच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा निघाली. निगमबोध घाटावर उपस्थितांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. देशाच्या तिन्ही सुरक्षा दलांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली.
डॉ. मनमोहन सिंग यांनी सन २००४ ते २०१४ असा प्रदीर्घ काळ देशाचे पंतप्रधानपद भूषवलं. त्याआधी त्यांनी अर्थमंत्री म्हणूनही काम केले होते. देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.
डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाची सेवा केली. भारतरत्न देऊन त्यांचा गौरव करण्यात यावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे. काँग्रेस पक्षानेही भारतरत्न देण्याबाबत शिफारस केली आहे. काँग्रेससह आम आदमी पक्षानेही डॉ. सिंग यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात यावे अशी मागणी केली आहे. याशिवाय अंत्यविधीच्या ठिकाणी डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक बांधण्यात यावे, असा प्रस्तावही काँग्रेसने मांडला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta