केरळ : मल्याळम चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेते दिलीप शंकर 29 डिसेंबर रोजी सकाळी त्यांच्या हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळले. या बातमीने संपूर्ण फिल्म इंडस्ट्री हादरली आहे. हॉटेलच्या खोलीत दिलीप शंकर यांचा मृतदेह सापडला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दिलीप शंकर यांनी आत्महत्या केली की, नैसर्गिक मृत्यू हे अद्याप समजू शकलेलं नाही. मृतदेहाच्या पोस्टमॉर्टमनंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होऊ शकतील, असं पोलिसांचे म्हणणे आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, दिलीप शंकर यांचा मृतदेह तिरुअनंतपुरममधील हॉटेलच्या खोलीत आढळून आला. ते ‘पंचगनी’ या टीव्ही शोचं शूटिंग करत होते आणि त्यासाठी ते गेल्या काही दिवसांपासून त्याच हॉटेलमध्ये थांबले होते. खोलीतून दुर्गंध येत असल्याचे हॉटेल कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर दिलीप यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
हॉटेलच्या खोलीतून बाहेरच पडत नव्हते, दिलीप शंकर
दिलीप शंकर गेल्या काही दिवसांपासून हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडले नव्हते. त्यांना बाहेर येताना कोणीही पाहिलं नव्हते. मात्र दिलीप शंकर यांचा मृत्यू कसा झाला? हे अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळावरून सुसाईड नोटसारखे काहीही मिळालेले नाही.
पोलिसांकडून कसून तपास सुरू
दिलीप शंकर यांच्या अचनाक आणि संशयास्पद मृत्यूमुळे संपूर्ण इंडस्ट्री हादरली आहे. तर, चाहत्यांना धक्का बसला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.