नवी दिल्ली : भारताची स्टार नेमबाज मनू भाकरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनू भाकरचे मामा आणि आजीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हरियाणातील महेंद्रगडच्या बायपास रोडवर हा अपघात घडला. मनू भाकरचे मामा आणि आजी हे दोघेही स्कूटीवरुन जात असताना अचानक एका गाडीने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कार चालक फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनू भाकरचे मामा युद्धवीर सिंग हे रोडवेजमध्ये ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होते. त्यांचे महेंद्रगड बायपासवर घर आहे. ते आज नेहमीप्रमाणे सकाळी कामासाठी घराबाहेर पडले. त्याच वेळी मनूची आजी सावित्री देवी यांना त्यांच्या लहान मुलाच्या घरी लोहारु चौकात जायचे होते. त्यामुळे युद्धवीर यांनी त्यांच्या आईला दुचाकीवर बसण्यास सांगितले आणि ते एकत्र निघाले.
मनू भाकरचे मामा हे दुचाकी चालवत कालियाना वळणाजवळ आले. त्याचवेळी समोरुन भरधाव वेगात कार येताना दिसली. हा कार उलट दिशेने येत होती आणि तिचा वेग प्रचंड होता. यावेळी कार चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानतंर ती कार थेट मनू भाकर यांच्या दुचाकीला जाऊन आदळली. यावेळी युद्धवीर सिंग आणि सावित्री देवी हे रस्त्यावर पडून जखमी झाले. तर भरधाव वेगात येणारी कार ही रस्त्याच्या कडेला उलटी झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघांचा जागीच मृत्यू झाला.
कार चालक फरार
या घटनेनंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी ताताडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी मनू भाकरचे मामा आणि आजीचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. तसेच सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत असून आरोपींचा शोध घेत आहे. मनू भाकरला दोन दिवसांपूर्वी राष्ट्रपतींकडून खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. त्यातच आता तिच्यावर हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta