नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या सियालदह न्यायालयाने आज (20 जानेवारी) कोलकाता आरजी कर बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने त्याला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. शिक्षेची घोषणा करताना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिर्बन दास म्हणाले की, हे दुर्मिळ प्रकरण नाही, त्यामुळे ते दोषीला जन्मठेपेची शिक्षा देत आहेत.
भारतीय न्याय संहितेच्या कलम 64, 66 आणि 103 (1) अंतर्गत संजय रॉय दोषी आढळला आहे. या कलमांतर्गत गुन्हेगाराला जास्तीत जास्त फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतूद आहे. मात्र न्यायाधीशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला पीडितेच्या कुटुंबीयांना 17 लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. यावर पीडितेच्या पालकांनी भरपाई घेण्यास नकार दिला.
पीडितेच्या पालकांनी केली फाशीची मागणी
पीडितेच्या पालकांकडून उपस्थित राहिलेल्या वकिलानेही जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली होती. संजय रॉय हा सिव्हिक व्हॉलंटियर असल्याने हॉस्पिटलच्या सुरक्षेची जबाबदारी त्याच्याकडे होती. पण त्याने सुरक्षा करण्याऐवजी पीडितेसोबत जघन्य गुन्हा केला आहे, त्यामुळे त्याला जास्तीत जास्त (फाशी) झाली पाहिजे, असा युक्तिवाद वकिलांनी केला. पण, न्यायालयाने सुनावणीअंती आरोपीला जन्मठेप सुनावली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta