तुर्कस्तानच्या एका स्की रिसॉर्टमधील एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीत किमात ६६ लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर ५० पेक्षा जास्त नागरिक यात जखमी झाले आहे. स्थानिक वेळेनुसार ३ च्या सुमारास ही आग लागली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आगीची दाहकता पाहायला मिळते.
तुर्कस्तानचे मंत्री अली येर्लिकाया यांनी या अपघाताची माहिती दिली. ते म्हणाले, ‘तुर्कस्तानच्या बोलू प्रांतातील कार्तलकाया रिसॉर्टमधील एका इमारतीमध्ये पहाटे ३.२७ वाजता आग लागली. आगीत दुर्देवाने ६६ जणांचा जीव गेला. तर ५१ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातातील पीडितांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. आगीच्या ज्वालांनी वेढलेले लोक इमारतीतून बाहेर पडण्यासाठी खिडक्यांमधून उडी मारण्याचा प्रयत्न करत होते. या प्रयत्नांमध्ये दोघांचा मृत्यू झाला.’
या भयावह अपघाताचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. व्हिडीओमध्ये इमारतीच्या भोवती आगीमुळे झालेला धूर देखील दिसतो. यावरुन ही आग किती भयंकर होती हे लक्षात येते. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच २८ रुग्णवाहिकांनाही तेथे पाठवण्यात आले.
बोलू प्रांताचे गव्हर्नर अब्दुलअजीझ आयदिन यांनी ‘घटनेच्या वेळी हॉटेलमध्ये तब्बल २३४ पाहुणे थांबले होते. जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यातील सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक फिरण्यासाठी रिसॉर्टमध्ये आले होते. त्याच दरम्यान हा मोठा अपघात झाला’, अशी माहिती दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta