
नवी दिल्ली : खा. संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर जळजळीत टीका केली. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा नव्हे तर अमित शाह यांचा सत्कार केला, अशी टीका संजय राऊत यांनी केली. शरद पवार यांनी राज्याचे तुकडे करणाऱ्या अमित शाह यांचाच सत्कार केला, अशी टीका संजय राऊतांनी पत्रकारांशी बोलताना केली. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यातील दुरावा दिसून येत आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी शरद पवार यांनी दिल्लीतील कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
एकनाथ शिंदेंना “महदजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार” शरद पवार यांच्या हस्ते मंगळवारी दिल्लीमध्ये प्रदान करण्यात आला. त्यानंतर ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंची शिवसेना काँग्रेसपासून दुरावली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेससोबतही दरी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळं समीकरण पाहायला मिळू शकते, अशी चर्चा आहे.
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली. त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते, ही आमची भावना आहे. आम्ही महाराष्ट्रातील लोकांसमोर कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कोणी कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो. पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, आम्ही ज्यांना महाराष्ट्राचे शत्रू समजतो. त्यांच्यासोबत खुलेआम बसणे आणि त्यांना असे सन्मान आपल्या हातून देणं ही योग्य गोष्ट नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Belgaum Varta Belgaum Varta