
नवी दिल्ली : २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी हा निर्णय जाहीर केला आणि भविष्यात आणखी प्रत्यार्पणाचे संकेत दिले.
“आम्ही एका अतिशय हिंसक माणसाला (तहव्वुर राणा) ताबडतोब भारतात परत पाठवत आहोत. याबाबत आमच्याकडे बऱ्याच विनंत्या आल्या आहेत. आम्ही गुन्ह्यांवर भारतासोबत काम करतो आणि आम्हाला भारताची परिस्थिती सुधारायची आहे”, असं ट्रम्प म्हणाले.
२१ जानेवारी रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यार्पणाला विरोध करणारी याचिका फेटाळून लावली. राणा सध्या लॉस एंजेलिस येथे तुरुंगात आहे. त्यामुळे आता राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) नमूद केलं की सर्व कायदेशीर प्रक्रिया संपली असून त्याच्या हस्तांतरणाची तयारी सुरू आहे.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी ७ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत नमूद केले की, “भारतीय अधिकाऱ्यांसमोर त्याच्या आत्मसमर्पणाच्या लॉजिस्टिक्सवर काम करण्यासाठी आम्ही अमेरिकन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत आणि पुढील घडामोडी होताच आम्ही माहिती देऊ.” ही प्रक्रिया अंतिम करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) एक पथक लवकरच अमेरिकेला जाण्याची अपेक्षा आहे.
पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक राणा याला २००९ मध्ये शिकागोमध्ये पाकिस्तानस्थित दहशतवादी नेटवर्कमध्ये त्याच्या भूमिकेसाठी अटक करण्यात आली होती. लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेला पाठिंबा दिल्याबद्दल अमेरिकेत त्याला दोषी ठरवण्यात आले असले तरी, मुंबई हल्ल्यातील थेट सहभागातून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली .परंतु, भारत त्याच्या प्रत्यार्पणाचा पाठपुरावा करत आहे, त्याने हल्ल्यांसाठी गुप्त माहिती गोळा करण्यात प्रमुख कट रचणाऱ्या डेव्हिड कोलमन हेडलीला मदत केल्याचा आरोप केला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta