नवी दिल्ली : ज्येष्ठ सनदी अधिकारी ज्ञानेश कुमार यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून १९ फेब्रुवारी रोजी ते पदभार स्वीकारतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या निवड समितीने ज्ञानेश कुमार यांच्या नावाला मंजूरी दिली. त्यानंतर विधी व न्याय मंत्रालयाकडून याबाबतचा शासन निर्णय सोमवारी (१७ फेब्रुवारी) रात्री काढला. ज्ञानेश कुमार यांचा कार्यकाळ २६ जानेवारी २०२९ पर्यंत असणार आहे.
देशाचे २६ ने निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार या वर्षाच्या शेवटी बिहार विधानसभा निवडणूक आणि २०२६ साली केरळ आणि पद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकांवर देखरेख ठेवतील. याचवर्षी तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या दोन महत्त्वाच्या राज्यातही विधानसभा निवडणुका होणार आहेत.
राम मंदिर निर्माण समितीवर काम केले
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० हटविले. या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात ज्ञानेश कुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी ज्ञानेश कुमार गृह मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून काम करत होते. तसेच अयोध्येतील राम मंदिर निर्माण समितीचेही ते सदस्य होते. तसेच राम मंदिरातील प्रभू श्रीराम यांच्या बाल रुपातील मूर्तीची निवड करण्याच्या मंडळातही त्यांचा समावेश होता.
ज्ञानेश कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्ताचीही निवड करण्यात आली आहे. १९८९ च्या बॅचचे हरियाणा केडर डॉ. विवेक जोशी हे आता निवडणूक आयुक्त असतील. निवडणूक आयुक्त हा पुढे जाऊन मुख्य निवडणूक आयुक्त होतो, असा प्रघात राहिला आहे. ज्ञानेश कुमार हेदेखील राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहत होते.