
मराठमोळ्या ग्रंथदिंडीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संमेलनाचे उद्घाटन
नवी दिल्ली : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद पुणे-दिल्ली आयोजित 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होत आहे. 21, 22 आणि 23 फेब्रुवारीला हे साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद जेष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर या भूषवणार आहेत. देशाच्या राजधानीत तब्बल 71 वर्षानंतर साहित्य संमेलन होत आहे. देशाच्या राजधानीत आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर प्रथमच होत असलेल्या या, मराठी साहित्य संमेलनामुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण जगभरातील मराठी भाषिकांच्या नजरा या संमेलनाकडे लागून राहिलेल्या आहेत. दिल्लीत असणाऱ्या साहित्य प्रेमींसाठी ही पर्वणीच आहे. या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत. उद्या शुक्रवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहाणार आहेत. उद्घाटनाचा सोहळा दिल्लीच्या विज्ञान भवनात पार पडणार आहे.
असे आहेत उद्या पहिल्या दिवशीच्या संमेलनाचे कार्यक्रम
उद्या सकाळी ग्रंथदिंडीची सुरुवात देशाच्या संसदेतील छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून होणार आहे. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे याच्या हस्ते ग्रंथदिंडीस प्रारंभ होणार असून नॅशनल बुक ट्रस्टचे चेअरमन मिलिंद मराठे, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ.रविंद्र शोभणे, राज्याचे सांस्कृतिक सचिव विकास खारगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. या दिंडीत साहित्यिक, साहित्यप्रेमी, मराठी मंडळी सहभागी होणार आहेत. विविध कला पथकेही या दिंडीत सहभागी होतील,
दुपारी 3.30. ला विज्ञान भवनात हा कार्यक्रम होईल. या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. राज्यातील साहित्यिकही या साहित्य सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजता उद्घाटनाचे दुसरे सत्र संमेलनस्थळी होणार असून याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य मंत्री अशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल. मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे यांचे पूर्वाध्यक्ष भाषण होईल, तर संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण होईल.
संमेलनाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रकाशकांचे स्टॉल असणार आहेत, तसेच याठिकाणी ‘संत महापती’ मंच असून तिथे इच्छूक साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन होईल. या साहित्य संमेलनास देशाबाहेरूनही साहित्यिक मंडळी येणार आहेत. पाकिस्तान, इंग्लंड आणि अन्य काही देशांतून लोक या संमेलनासाठी येत आहेत. लंडनमधून एक व्यक्ती पुस्तक प्रकाशन करण्यासाठी येणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta