नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये हिमस्खलन होऊन 57 मजूर अडकले आहेत. त्यापैकी 16 मजूरांना बाहेर काढण्यात आले आहे. उत्तराखंड इथल्या चमोलीजवळच्या माणा गावाजवळ ही दुर्घटना घडली. चमोली ब्रदीनाथ हायवेवर अनेक मजूर काम करत होते. त्यावेळी अचानक ग्लेशियरचा मोठा तुकडा कोसळला. त्यामुळे हिमस्खलन होऊन अनेक मजूर खाली दबले गेले. यावेळी जवळपास 57 मजूर होते. त्यापैकी 16 जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आले असून, रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उत्तराखंड परिसरात बर्फवृष्टी होत आहे. आजही मोठ्या प्रमाणात बर्फाचा कडा कोसळल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मदत आणि बचावकार्य घटनास्थळी दाखल झाले असून, अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
घटनास्थळी सतत पाऊस आणि बर्फवृष्टी
बद्रीनाथ माणा इथं रस्त्याचे काम सुरु होते. या कामासाठी असलेले मजूर जिथे राहतात त्याच्या जवळ हिमनग कोसळला. त्यामुळे त्या परिसरात असलेले मजूर बर्फाखाली दबले गेले. आतापर्यंत किती मजूर अडकले आणि किती जणांना बाहेर काढलं याचा अधिकृत आकडा प्रशासनाने दिलेला नाही, पण उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, 57 मजूर इथे काम करत होते, त्यापैकी 16 जणांना बाहेर काढण्यात आले. चमोलीचे जिल्हाधिकारी संदीप तिवारी म्हणाले की, घटनास्थळी सतत पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे, त्यामुळे आम्ही हेलिकॉप्टर पाठवू शकत नाही. हालचाल अवघड आहे. सॅटेलाइट फोन उपलब्ध नाहीत, त्यामुळे आम्ही त्यांच्याशी बोलूही शकत नाही. कोणतीही जीवितहानी झाल्याचे अधिकृत वृत्त नाही.