अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. गुजरात अँटी टेररिस्ट स्क्वाड आणि फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्सने संयुक्त कारवाई करत दहशतवादी कनेक्शन असलेल्या संशयाखाली एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी १९ वर्षीय, अब्दुल रहमान असून तो अयोध्येतील फैजाबाद येथील रहिवासी आहे. या संशयीताला फरीदाबादमधून अटक करण्यात आली आहे. या तरुणाकडून दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरू होती. त्याच्याकडून दोन हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले असून सुरक्षा यंत्रणांनी ते तत्काळ निकामी केले आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला संशयित तरुण अब्दुल रहमान पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होता आणि अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होता. अब्दुल रहमान अनेक कट्टरवादी गटांशी तो जोडलेला होता. त्याचं फैजाबादमध्ये मटणाचं दुकान असल्याचं तपासात समोर आलं आहे.
सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या उभारणीनंतर पाकिस्तान आयएसआयने भारतात मोठा दहशतवादी कट रचण्याची योजना आखली होती, या योजनेत अयोध्येतील राम मंदिराला लक्ष्य करण्याची योजना होती.
पोलिसांच्या तपासात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. अब्दुलने अनेकदा अयोध्येतील काम मंदिराची रेकी केली होती. येथील सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती त्याने आयएसआयसोबत शेअर केली होती. दहशतवाद्यांचं लक्ष्य राम मंदिरावर हँड ग्रेनेड हल्ला करण्याचं होतं. मात्र दहशतवादी त्यांचं लक्ष्य पूर्ण करण्याआधीच पोलिसांच्या कारवाईमुळे मोठी घटना टळली आहे.
संशयिताला असं घेतलं ताब्यात
संशयित अब्दुल फैजाबादवरुन ट्रेन पकडून आधी फरिदाबादमध्ये पोहोचला. इथे त्याला एका हँडलरने हँड ग्रेनेड दिला. दहशतवादी योजनेनुसार तो ट्रेनने अयोध्या पोहोचून तिथे हल्ला करेल. पण त्याआधीच सुरक्षा एजेन्सीला काही माहिती मिळाली आणि त्यानंतर गुजरात एटीएस बआणि फरिदाबाद एसटीएफने संयुक्त कारवाई केली आणि रविवारी अब्दुल रहमानला ताब्यात घेतले.