नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. १४ मार्च रोजी वर्मा यांच्या निवसस्थानी आग लागल्यानंतर तेथे रोख रक्कम सापडली होती. याबाबत अधिकृत पुष्टी करताना सर्वोच्च न्यायालयाने अंतर्गत चौकशीचा अहवाल जारी केला आहे.
या अहवालात दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी २१ मार्च रोजी लिहीलेल्या पत्रात न्यायमूर्ती वर्मा यांना त्यांच्या शासकिय बंगल्याच्या खोलीत पैसे/रोख रक्कम आढळल्याबद्दल विचारणा केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलीस आयुक्त संजय आरोरा यांनी सरन्यायाधीश उपाध्याय यांच्याबरोबर शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ देखील अपलोड केले आहेत.
या फोटो आणि व्हिडीओमध्ये अग्निशामक दलाचा जवान अर्धवट जळालेल्या नोटा प्लॅस्टीकच्या बॅगेतून बाहेर काढताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती नोटांवरील महात्मा गांधी यांच्या फोटोचा संदर्भ देताना “महात्मा गांधी में आग लग गयी (महात्मा गांधींना आग लागली),” असे म्हणताना ऐकू येत आहे. उच्च न्यायालयाचा अहवाल सार्वजनिक करण्यापूर्वी सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या एका वरिष्ठ सदस्याला हा निर्णय कळवला असल्याचे सांगितले जात आहे.
न्यायमूर्ती वर्मा यांनी सरन्यायाधीश उपाध्याय यांना दिलेल्या अधिकृत उत्तरात त्यांच्यावर झालेल्या आरोप फेटाळून लावले आहेत. “मी तुम्हाला विनंती करतो की आम्ही खरोखर ज्या जागेत राहतो आणि कुटुंब म्हणून वापरतो त्या ठिकाणाहून कोणतीही रक्कम जप्त झालेली नाही हे तुम्ही लक्षात घ्यावे,” असे वर्मा म्हणाले आहेत. दरम्यान भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केल्यानंतर काही तासांतच हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी सादर केलेला अहवाल तसेच न्यायमूर्ती वर्मा यांचे उत्तर आणि इतर कागदपत्रे न्यायालयाच्या वेबसाइटवर अपलोड केली जातील असे सर्वोच्च न्यायालयाच्या निवेदनात सांगण्यात आले होते, त्यानुसार ही कागदपत्रे अपलोड करण्यात आली आहेत.
तीन सदस्यीय समिती
चौकशी समितीमध्ये पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जी. एस. संधावालिया आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनु शिवरामन यांचा समावेश आहे. दरम्यान, मुख्य न्यायाधीशांचा अहवाल, न्या. वर्मा यांचे उत्तर आणि अन्य कागदपत्रे यांची माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर दिली जाईल, असेही सर्वोच्च न्यायालयाच्या निवेदनात म्हटले होते.
न्या. वर्मा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी होळीच्या दिवशी रात्री साडेअकराच्या सुमारास आग लागल्यानंतर अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझविण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना रोख रक्कम सापडल्याचे वृत्त शुक्रवारी पसरले होते. मात्र अग्निशामक दलाच्या जवानांना रोख रक्कम सापडली नसल्याचे अग्निशामक विभागाच्या प्रमुखाने स्पष्ट केले होते.
हे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी कॉलेजियमची बैठक बोलावली आणि न्यायाधीश यशवंत वर्मा यांची दिल्ली उच्च न्यायालयातून अलाहबाद उच्च न्यायालयात बदली केली. दरम्यान न्यायाधीश यशवंत वर्मा यांची ऑक्टोबर २०२१ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयातून दिल्ली उच्च न्यायालयात बदली करण्यात आली होती.