नवी दिल्ली : सर्वसामान्यांच्या खिशाला चाप लावणारी बातमी समोर येत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार आहेत. सोमवारी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केली.
जागतिक स्तरावर तेलाच्या किमतींमध्ये चढउतार सुरु आहे. त्यात ट्रम्प प्रशासनाने प्रत्युत्तरात्मक शुल्काची घोषणा केली. या सर्व पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर 8 एप्रिलपासून लागू होणार आहेत. सरकारकडून अधिकृत आदेश जारी करून ही माहिती देण्यात आली आहे.
पेट्रोल आणि डिझेलवर सध्या किती उत्पादन शुल्क?
सोमवारी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 13 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये वाढवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
सरकारने यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी करताच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही वाढवण्याच्या बातम्या येऊ लागल्या. या वाढीचा भार सामान्य माणसालाही सहन करावा लागेल. याचा किरकोळ किमतींवर काय परिणाम होईल? हे नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आले नाही. असे असले तरी नंतर परिस्थिती स्पष्ट करण्यात आली. उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘किरकोळ किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता नाही. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती घसरल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करून वाढीव उत्पादन शुल्क समायोजित केले जाण्याची शक्यता आहे.’