पालेम : प्रेमविवाह केलेले अनुषा आणि ज्ञानेश्वर हे दाम्पत्य तीन वर्षांपासून कुटुंबापासून दूर होते. अलीकडच्या काळात त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील पालेम येथील उडा कॉलनी येथे वैवाहिक वादातून 8 महिन्याची गर्भवती असलेल्या 27 वर्षीय पत्नीची पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मृत अनुषा ही 8 महिन्यांची गरोदर होती आणि तिला रविवारी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते. त्याआधीच तिच्या पतीने तिची हत्या केली. या घटनेनंतर ज्ञानेश्वरने तिच्या कुटुंबीयांना फोन करून अनुषाची तब्येत खराब असल्याची माहिती दिली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ज्ञानेश्वरच्या कृत्यावर संशय आल्याने पोलिसांनी चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
आपल्याला कॅन्सर झाला असून लवकरच आपला मृत्यू होणार असल्याची बतावणी करून घटस्फोटासाठी तिच्यावर दबाव टाकत होता पण अनुषा कोणत्याही कारणास्तव संबंध तोडण्यास तयार नसल्याचे तपासात समोर आले आहे.