नवी दिल्ली : गुजरातच्या अमरेलीमध्ये विमान अपघाताची भीषण घटना घडली. मंगळवारी दुपारी अमरेलीतील गिरिया रोडवर एका खासगी कंपनीचे विमान अचानक कोसळले. विमान कोसळले तेव्हा त्यात वैमानिक होता. वैमानिकाचा या अपघातात मृत्यू झाला. एका खाजगी कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या पायलट प्रशिक्षण केंद्राचे हे विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला ज्यामुळे विमानाला आग लागली. घटनेची माहिती मिळताच अमरेली अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं.
प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे विमान अमरेलीतील एका निवासी भागात कोसळले. विमान एका झाडाला धडकले आणि नंतर एका मोकळ्या जागेवर कोसळले. अज्ञात कारणांमुळे दुपारी १२.३० च्या सुमारास अमरेली शहरातील गिरिया रोड परिसरातील एका निवासी भागात विमान कोसळले, ज्यामध्ये प्रशिक्षणार्थी वैमानिकाचा जागीच मृत्यू झाला. पायलट एकटाच उड्डाण करत होता. या अपघातात इतर कोणीही जखमी झाले नाही. विमान जळून राख झाले, अशी माहिती अमरेलीचे पोलीस अधीक्षक संजय खरात यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta